बारामतीत अवैध दारू व्यावसायिकांचा उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

बारामती : बारामतीत हातभट्टी बनविणाऱ्या अवैध व्यावसायिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला केल्याची घटना घडली असून हा हल्ला माळेगाव पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर झाल्याने एकच चर्चेचा विषय झाला आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक अवैध हातभट्टी चालकांवर कारवाई करण्यासाठी गेले असताना तेथील अवैध व्यावसायिकांनी पथकावर काठी आणि दगडाने हल्ला केला असुन यामध्ये एका सरकारी व एका खाजगी गाडीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार (ता.२३) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वरील घटना घडली असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक विजय वसंतराव रोकडे यांनी फिर्याद दिली आहे. गव्हाणे व धनगर कुटुंबियांनी उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी रात्रीच्यावेळी आमच्या घरी येऊन गरोदर महिलांसह मुलाबाळांना मारहान केली, असा आरोप केला. त्या कुटुंबियांनी एकत्रीत येत माळेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आणि आरडाओरडा केला मात्र रात्रीच्यावेळी हा गोंधळ झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती, परिणामी अनेकांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेत गर्दी केली होती. दरम्यान, बारामती-दौंड तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या माळेगाव येथे अवैद्य व्यवसायिकांवर कारवाई केली. ही कारवाई केल्याचा राग मनात धरून धनगर व गव्हाणे कुटुंबियांनी सरकारी कामात अडथळा आणला व आक्रमक भूमिका घेत त्यांनी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दगडाने हल्ला केला तसेच हाताने माराहाण केली, सरकारी गाड्या फोडल्या, अशी तक्रार राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक विजय वसंतराव रोकडे यांनी फिर्य़ादीमध्ये नमूद केली.