धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांचा सरकारला दोन दिवसाचा अल्टिमेटम

दोन दिवसात धनगर आरक्षणावर तोडगा न काढल्यास करणार पाणी त्याग.. उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांचा सरकारला इशारा ..
बारामती : धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून गेल्या आठ दिवसापासून बारामतीत धनगर समाजातील युवकांकडून आमरण उपोषण करण्यात आले असून गेल्या आठ दिवसात सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने धनगर उपोषणकर्त्यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. दोन दिवसात सरकारने जर धनगर आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर, मी पाणी त्याग आंदोलन करणार असल्याचे उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी सांगितले.
बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर धनगर समाजाला एस.टीचे आरक्षण मिळावे यासाठी चंद्रकांत वाघमोडे हे उपोषण करीत आहेत मात्र अद्याप सरकारकडून कोणतीच भूमिका घेण्यात आली नाही त्यामुळे वाघमोडे यांनी सरकारला इशारा दिला आहे. तर उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी धनगर समाजाचे समाज बांधव मोठ्या संखेने एकत्र येत आहेत.
बारामतीमधील धनगर समाजाच्या आरक्षणाची पुढील दिशा ठरली असून उद्यापासून सर्व पंचायत समिती गण निहाय गावे बंद ठेवणार ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचाच भाग म्हणून दि.16 नोव्हेंबर रोजी बारामती शहर बंद पुकारण्यात आला होता त्याला बारामतीतील व्यापारी महासंघाने प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
धनगर समाजाच्या आरक्षणाची एसटी प्रवर्गात अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी बारामतीत सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाचा आज नववा दिवस आहे धनगर समाजाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरली आहे. उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी आता पंचायत समिती गणनिहाय सर्व गावे बंद ठेवण्याचे आवाहन समाज बांधवांना केले आहे. त्यानुसार यापुढील काळात प्रत्येक दिवशी एक गणनिहाय गावांमध्ये बंद पाळला जाणार आहे.