तलावाला गेला तडा, म्हणून पाण्याचा खडा ?

तलावाला गेला तडा, म्हणून पाण्याचा खडा ? बारामती नगरपालिकेचा गजब कारभार
बारामती : निरा डावा कालव्याचे चालू आवर्तन बंद झाल्याने उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करून सध्या बारामती शहरात पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक प्रकार म्हणजे चक्क साठवण तलावाला दोन ठिकाणी तडा गेला असून लाखो लिटर पाणी रोज वाया जात आहे.
बारामती नगरपालिकेने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी 128 दशलक्ष लिटर साठवण क्षमतेचा तलाव केंद्र व राज्य शासन पुरस्कृत लहान व मध्यम नागरी पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च 2 सप्टेंबर 2011 साली तलावाचे लोकार्पण केले.
मात्र हा तलाव झाल्यापासून या तलावाचे डागडुजीची कामे अनेक वेळा केल्याचे सूत्रांनी सांगितले तसेच ज्या ठेकेदाराने ही कामे केली आहेत त्याने केलेले काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे बारामतीतील अनेक जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे, मात्र पाण्याच्या तुटवड्याच्या काळात नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजन आणि भोंगळ कारभारामुळे या तलावातील लाखो लिटर पाणी रोज नाल्यात वाहून जात आहे, यासंदर्भात अनेक नागरिकांनी नगरपालिकेत तक्रारी अर्ज देऊन देखील नगरपालिकेने त्या केलेल्या तक्रारी अर्जाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा आठवडी खडा सुरु केला आहे. मात्र वेळीच तलावाचे काम केले नाही तर एन उन्हाळ्यात बारामतीकरांची तहान भागविणे मुश्कील होणार हे मात्र नक्की, दुसरीकडे वर्षाभारापुर्वीच या तलावाची दुरुस्तीची निविदा काढून दुरुस्ती करण्यात आली मग ही पाण्याची गळती कशी काय सुरू झाली अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.
या संदर्भात नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता सचिन खोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या तलावाच्या दुरुस्तीची निविदा प्रक्रियेत असून लवकरच दुरुस्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.