मतदार नाव नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदार नाव नोंदणीसाठी विशेष अभियान राबवावे आणि मतदार जागृती उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
लोकसंख्येच्या तुलनेत कमी मतदार असलेल्या मतदान केंद्राची माहिती घेण्यात यावी. अल्पसंख्याक समुदाय, औद्यागिक विभागातील कामगार, दुर्गम भागातील मतदार, बांधकामस्थळी काम करणारे कामगार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, महिला मतदार यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. लोकसंख्येच्या गुणोत्तराच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी असलेल्या मतदान केंद्रावर महिला मतदारांच्या नोंदणीसाठी महिला बचत गट आणि महिला मेळावे भरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.
युवा मतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालये आणि खासगी शिकवणी वर्गाशी संपर्क साधावा. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करून त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण द्यावे. महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याचे नियोजन करावे. विधानसभा मतदारसंघातील प्रसिद्ध खेळाडू, कलाकार, उद्योगपती, प्रभावी व्यक्ती अशा मतदारांना ‘आयकॉन’ म्हणून घोषित करीत त्यांना मतदार नोंदणी शिबिराच्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलवावे. विविध सण, उत्सवाच्यावेळी मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करावे, असे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.