कर्मवीर भाऊराव पाटील यांचा राजकीय व सामाजिक वारसा
आज २२ सप्टेंबर, २०२३ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती या निमित्त त्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सतत वेगवेगळे प्रयोग केले. अगदी शेतकरी कामगार पक्षाच्या निर्मितीचे कर्मवीर भाऊराव पाटील हे एक शिल्पकार आहेत. त्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध सतत लढा दिला. राजकीय सत्ता आणि शिक्षणा मधूनच बहुजन समाज्याच्या शोषणकरी मुक्ततीच मार्ग जातो. म्हणून त्यांनी सामाजिक प्रथे विरोध लढण्यासाठी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. परंतु त्याचे कार्य हे फक्त शिक्षणा पुरते मर्यादित नव्हते. त्याचे कार्य हे शिक्षण क्षेत्र पर्यन्त मर्यादित करणे हे खरे तर त्याच्यावर अन्याय केल्या सारखे होईल.
रयत गीत
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||
कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे.
शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मनासी मुरते आहे.
धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.II १ II
वरील ओळी ह्या त्यांच्या विचाराची दूरदृष्टी स्पष्ट करतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून ज्ञानयज्ञ सुरू केला. त्याला बहुजन समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला.
महात्मा फुले, शाहु महाराज यांच्याकडून प्रेरणा घेऊन अगदी कठीण प्रसंगातून बहुजन समाजाला शिक्षण देऊन शहाणे करण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर महात्मा गांधीजी यांच्या विचारांचा प्रभाव खोलवर दिसून येतो. गांधीजीची “नई तालीमचा” प्रयोग त्यांनी राबविलेला दिसून येतो.
प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या आत्मचरित्र मध्ये नमूद केले आहे. महात्मा गांधीजीं यांनी अस्पृश्यांसाठी एका फ़ंडाची उभारणी केली होती. त्यामधून कर्मवीर भाऊराव पाटील यांना पैसे मिळाले पाहिजे. यासाठी पुण्यात महात्मा गांधीजी यांची कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांनी अस्पृश्या फ़ंडातुन रक्कम मिळाली पाहिजे. यासाठी गांधीजीशी अक्षरश हुज्जत घातली. या अस्पृश्या फ़ंडाचे कार्यालय दिल्लीला होते. सर्व खातरजमा करून ही रक्कम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला मिळाली. कारण अनेक जाती धर्माची मुलं ह्या संस्थेत शिकत होती. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देखील मोलाची साथ त्यांना मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वांच्या नावाची आणि विचाराची खरी खुरी स्मारके निर्माण केली आहेत. या महापुरुषांच्या नावाने त्यांनी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यामधून आज हजारो विद्यार्थी घडत आहेत.
गांधी हत्येनंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँट रोखली
मुंबई प्रांताचे तत्कालीन (त्याकाळी प्रांताच्या मुख्यमंत्र्यास पंतप्रधान असे म्हटले जाते होते.) पंतप्रधान बाळासाहेब खेर आणि गृहमंत्री मोराजी देसाई होते. (मोराजी देसाई नंतर मुंबई राज्याचे मुख्यमंत्री आणि १९७७ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले.) महात्मा गांधीजी यांच्या हत्येनंतर बहुजन समाज संतप्त झाला होता. त्यामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात दंगली उसळलेल्या. त्यामध्ये ब्राह्मण समाजाचे वाडे, घरे जाळली गेली. याचे वर्णन माडगूळकराच्या वावटळ या कादंबरीत आले आहे.
सेनापती बापट यांनी नगरला त्याचे व्याही सप्तर्षी वकिलांचा वाडा जाळण्यासाठी आलेल्या लोकांना वाडा जाळण्यापासून परावृत्त केले होते. तसेच सत्यशोधक चळवळीच्या नेतृत्वाने आणि बहुजन नेत्यांनी ह्या दंगली होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक पर्यन्त केले होते. यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, देशभक्त केशवराव जेधे, शंकरराव मोरे, तुळशिदास जाधव, काकासाहेब वाघ, कॉम्रेड दत्ता देशमुख हे नेते त्यावेळी काँग्रेस मध्ये होते. तर रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दंगली रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते.
परंतु पुण्यात बाळासाहेब खेर व मोरारजीभाई देसाई यांनी शनिवारवाड्यासमोर एक सभा घेतली. या सभेत ” रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी पुन्हा असे काही होऊ देणार नाही”. अशी ग्वाही बाळासाहेब खेर यांनी या सभेत दिली. त्यावेळी पुण्याचे कलेक्टर स. गो. बर्वे होते. (महाराष्ट्रातील पाणी आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव काम केले. त्यांनी महाराष्ट्रातील नद्यांचं पहिल्यांदा ऑडिट केले. ज्या कामाची दखल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतली.) 1962 पुण्यातून विधानसभेवर निवडून गेले. नंतर खासदार झाले. त्याच्या नावाने पुण्यात स. गो. बर्वे चौक सुध्दा आहे. ( दंगली नंतर लोकप्रतिनिधी बनण्याचा मार्ग तयार होतो. हा आमदार, खासदार बनण्याचा इतिहास तसा फार जुना आहे.)
या दंगलीच्या नंतर बाळासाहेब खेर सरकारने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर काही आरोप ठेवुन रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद केली. त्यावेळी बहुजन समाजातील नेतृत्वाने कर्मवीर भाऊराव पाटील यांना साथ दिली. नगर जिल्ह्यात पदमश्री विठलराव विखे पाटील, कॉम्रेड दत्ता देशमुख, बापूसाहेब भापकर, भाई सथ्या अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, कॉम्रेड पी. बी. कडू पाटील, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब थोरात इत्यादींनी मदत केली. अशा प्रकारची मदत महाराष्ट्र भरातून झाली. हे लक्षात घेतले पाहिजे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणा बरोबर राजकीय सत्तेला तितकेचं महत्त्व दिले. म्हणून काँग्रेस पक्ष जेव्हा शेतकरी कामगाराच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडवित नाही. असे लक्षात आल्या नंतर शेतकरी, कामगारांचे हित जोपासणारा पक्ष स्थापन करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पुढाकार घेतला. यामधून शेतकरी कामगार पक्षाची स्थापन झाली.
शेतकरी कामगार पक्षाच्या निर्मितीची कुळकथा
१९४२ च्या काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसने शेतकरी कामगारासाठी काम करण्याचा ठरावं मांडला होता. परंतु तो पुढे अंमलात आला नाही. काँग्रेस अंर्तगत ‘काँग्रेस शेतकरी कामगार संघ’ म्हणून काम करत होते. परंतु वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेस अंतर्गत उप – संघटना स्थापन करता येणार नाही. अशी तरतूद केली. त्यानंतर शेवटी १९४९ मध्ये केशवराव जेधे, शंकरराव मोरे, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, काकासाहेब वाघ, तुळशीदास जाधव, कॉम्रेड दत्ता देशमुख, भाऊसाहेब राऊत इत्यादींनी एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला.
शेतकरी – कामगारांचे तत्वज्ञान मांडणारा प्रसिध्दी दाभाडी प्रबंध स्वीकारला गेला. पण या शेतकरी कामगार पक्षा मध्ये तीन गट होते. त्यामध्ये पहिला गट हा सत्यशोधक चळवळी मधून आला होता. तर दुसरा गट काँग्रेस मधून आणि कम्युनिस्ट पक्षातुन म्हणजे (1942 चले जाव चळवळीच्या पाठिंबा वरून कम्युनिस्ट पक्षात मतभेद झाल्यामुळे) जी ‘नवजीवन संघटना’ निर्माण झालेला गट होता. हा शेतकरी कामगार पक्षातील तिसरा गट होय.
या तिन्ही गटांनी एकत्रित येऊन शेतकरी कामगार पक्ष स्थापन करण्यात आला होता. केशवराव जेधे आणि शंकरराव मोरे यांना क्रांतिसिंह नाना पाटील हे आपल्या नव्या पक्षात हवे होते. यासाठी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना गळ घातली. तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दहा वर्षे हा पक्ष एकजुटीने चालविणार असतील तरच आपण शेतकरी कामगार पक्षात येऊ असे सांगितले. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांना शब्द दिल्यावर क्रांतिसिंह नाना पाटील हे शेतकरी कामगार पक्षात आले.
परंतु दाभाडी प्रबंध राबविण्यावरून शेतकरी कामगार पक्षाने जी भूमिका मांडली होती. हा उदात्त शेतकरी कामगाराचा खरा – खुरा क्रांतिकारी राजकीय पक्ष उदयाला आला होता. नंतर मात्र या पक्षामध्ये अंतर्गत मतभेद होऊन हा पक्ष फुटला. (भारतीय पक्ष पध्दतीचे हे एक महत्वाचे वैशिष्ट्ये आहे. कारण राजकीय पक्षांन मध्ये सदैव मतभेद होऊन फूट पडते.) त्यामधून नवीन पक्ष जन्मास येतात. जर शेतकरी कामगार पक्षाचा एकोपा राहिला असता. शेतकरी, कामगारांच्या हिताचं राजकारण साकारले गेले असते. तर महाराष्ट्राचे आजचे चित्र हे यापेक्षा निश्चित वेगळे असते.
महाराष्ट्र पुरोगामी वारसा पासून दूर जातो आहे का?
आज महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, संत गाडगे बाबा, देशभक्त केशवराव जेधे यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडला असता. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात समाजवादाचा पाळणा हलवून समाजवादी महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण झाले असते. तर महाराष्ट्र हा देशाला वैचारिक दिशा देऊ शकला असता.
महाराष्ट्रात आपण समाजवाद आणणे तर दूर परंतु सामाजिक आणि आर्थिक विषमता दुर करू शकलो नाही. हे आजच्या महाराष्ट्राचे वास्तव चित्र आहे. या उलट पुरोगामी महाराष्ट्र का म्हणायचं असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय भाषा ही तीव्र विखारी, विषारी, अविवेकी, असहिष्णुतापूर्ण बनत चालली आहे.
पुरोगामी, उदारमतवादी वारसा सोडून जातीय, धार्मिक, कट्टर, कर्मकांडी, अंधश्रद्धाळु बनत चाललो आहे. सत्ताधारी मंडळी सुद्धा सत्तेसाठी तत्व, मूल्य, पायदळी तुडवत आहेत. असे महाराष्ट्राचे वास्तव चित्र आहे. उजव्या शक्ती आपल्या विचाराचे जाळ पसरवण्यात यशस्वी होत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विरोधाची जागा द्वेषा भावनेने घेतली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विरोधाला विरोध केला जातो आहे.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण या महापुरुषांच्या नावाचा नाम जप करतो आहे. परंतु त्याच्या वैचारिक वारस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे. महाराष्ट्रात अविवेकी, असहिष्णुता बळावत चालली आहे. शिक्षण, आरोग्य इत्यादी मुद्याची हेळसांड होत आहे. शिक्षण क्षेत्रात तर काही सन्मानयी अपवाद वगळता. नव्या शिक्षण (महर्षीनी) अर्थात सम्राटांनी नवं नवी गुलामगिरीची षडयंत्राची व्यवस्था निर्माण केली आहे.
आपण खरंच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या विचाराचा वसा आणि वारसा या पासून दूर जातो आहे का? याचा विचार करण्याची खरी वेळ आली आहे.
आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त याचा विचार करणे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल. आज त्या वैचारिक वारस्याच्या मार्गाने जावे लागेल.
लेखन – राजा पांडे ( लेखक, राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत )