कोतवाल पदासाठी २१ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत

बारामती : तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पद सजांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय, बारामती येथे आयोजित केला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्याचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. यानुसार माळेगांव बु., जळोची, मळद, सुपे, शिर्सुफळ, सांगवी, लोणी भापकर, शिरष्णे, शिरवली, निंबुत, कोऱ्हाळे खु., कन्हेरी, नारोळी, उंडवडी क.प., जळगांव सुपे, ढाकाळे, तरडोली आणि मोढवे अशी एकूण १८ पदे रिक्त आहेत. सहाय्यक आयुक्त पुणे (मागासवर्ग कक्ष) यांच्याकडील मंजुर बिंदुनामावली प्रमाणे कोतवाल पद रिक्त सजांची आरक्षण सोडत काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
तरी संबंधित सजाच्या आरक्षण सोडतीसाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर आणि तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.