भीमथडी जत्रा २१ ते २४ डिसेंबर रोजी पुण्यात भरणार
बारामती : महिलांना आर्थिक सक्षम करणारी भीमथडी जत्रा नव्या रूपात वेगवेगळ्या बदलांसह दिनांक २१ ते २४ डिसेंबर 2023 रोजी कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर पुणे येथे भरणार असून पुणेकरांना अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थांवर ताव मारता येणार आहे.
यावर्षी देखील अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी भीमथडी जत्रा आयोजित करण्यात आली असून भीमथडी जत्रा’ ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने संस्थेच्या वतीने गेली १६ वर्ष या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे. आज हजारो महिलांना आर्थिक सक्षम करणारी भीमथडी जत्रा अनेक महिलांचा आत्मविश्वास वाढवत असून, सामाजिक कार्यात सहभागी होत असल्याचे चित्र पाहून आयोजक म्हणून मला अभिमान आहे असे मत आयोजक सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.
दरवर्षी नावीन्यपूर्ण आकर्षण घेऊन येणारी भीमथडी जत्रा यंदा भरडधान्यासह (मिलेट-नाचणी, राळ, सावा, भगर, सामा, वरई) वैविध्यपूर्ण वस्तूंसह, नैसर्गिक शेतीतून उत्पादित होणारा माल, विविध प्रक्रिया उद्योगातील पदार्थ , अशी वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना घेऊन येत आहे. यासाठी यंदा नवीन महिला बचत गटांना प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे.
यंदाची भीमथडी जत्रा १७ व्या वर्षात पदार्पण करत असून महाराष्ट्राची कलासंस्कृती (गोंधळी, पोतराज, भारुड, पाथरवट, बुरुड, केरसोनीवाले, नंदीबैल,) ग्रामीण खाद्य महोत्सव यासह ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, मसाले पदार्थ ,लोणची,कपडे,फळे पालेभाज्या,धान्य,कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीस उपलब्ध असतील.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यासह देशातील इतर राज्यामधून महिला बचत गट व महिला उद्योजिका यांना ३१० स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या भीमथडी जत्रेत महाराष्ट्रासह परराज्यातील महिलांचे निवडक उत्पादनांचे सिलेक्ट दालन, पर्यावरण वाचवा संदेश,अशी वेगवेगळी दालने असून, हायड्रोपोनिक्सची शेती, मातीविना शेती, विषमुक्त पालेभाज्या, किचन गार्डन, मत्स्यव्यवसाय,पुष्परचना,मधाचे विविध प्रकार,असे माहितीचे वैविध्यपूर्ण स्टॉल असतील. या जत्रेच्या नोंदणीसाठी व अधिक महितीसाठी – 9067278327 www.bhimthadijatra.com यावर संपर्क करावा असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
